राक्षस !!




                                          (75% ATTENDANCE - PART 05)
                                                   END OF THE SEASON





            वेळ सकाळची. लेक्चरला आणखीन १५ मिनिटे होती. मी म्हटलं इतक्या वेळात आपला चहा पिऊनही होईल. असही लवकर जाऊन काही त्या सरांच लेक्चर अटेंड करण्यात माझा काहीच इंटरेस्ट नव्हता पण 75% Attendance भरायची होती ना...! म्हणून लेक्चर करणे तर भागच होते. मी आपलं कँटीन मध्ये आलो. चहा घेतला आणि टेबल कडे वळलो. तेथे पाहतो तर  कोपऱ्यात विन्या बसलेला दिसला. मी जाऊन त्याच्या समोरील खुर्चीवर बसलो. काहीतरी विचारात तो असावा, कारण एकटक शून्य दृष्टीत तो पाहत बसला होता. त्याचे लाल डोळे रात्री त्याची पुरेशी झोप न झाल्याची साक्ष देत होते. मी जाऊन त्याच्या समोर बसलो तरी त्याचे लक्ष माझ्याकडे नव्हते. त्याच्या नजरेसमोर हात फिरवला तेव्हा कुठे तो भानावर आला. काहीसा हरखून तो म्हणाला "अरे जया तू कधी आलास?", "मी केव्हाचाच आलोय, पण तू कुठे हरवलास? आणि मुठीत काय आहे या?", मी असे विचारताच त्याने त्याची ती बंद मूठ लगेच मागे घेतली आणि विषय टाळू लागला. मानसशास्त्राचा नियमच आहे, तुम्ही एखाद्यापासून जर काही लपवायला लागलात तर त्या व्यक्तीला तीच गोष्ट जाणून घेण्याची अधिकच इच्छा होते. मी देखील काही याला अपवाद नव्हतो. यामुळे माझी पण त्याच्या हातात काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा अधिकच बळकट झाली. मी विनयच्या मागेच लागलो, पण तो काही दाखवायचे नावच घेईना. उलट तो अधिकच लपवू लागला. शेवटी मी जागेवरून उठलो, ज्या हातात तो काहीतरी लपवत होता तो हात पकडला आणि तो त्याच्या पाठीमागे नेऊन पिरगाळला त्यामुळे त्याची मूठ लगेच सैल झाली आणि त्याच्या हातात असलेली काचेची लहान बाटली घरंगळत खाली पडली. सुदैवाने उंची कमी असल्याने ती फुटली नाही. विनयने ती वाकून घ्यायच्या आत मी ती चपळतेने उचलून घेतली.


       "कशाचं औषध आहे हे, तू आजारी आहेस का?" मी दोन तीन वेळा विचारण्याचा निष्फळ प्रयत्न केला. विन्या काहीच सांगायला तयार नव्हता. मी त्या बाटली वरील नाव गुगल केलं असता, आलेले result पाहून अगदीच अचंबित झालो. मला दुसरे काहीच सुचले नाही, मी एक जोरात विन्याच्या कानाखाली दिली, "वेडा आहेस का तू? हे काय करत होतास?". ती पॉइझन ची बाटली होती....! विन्या टेबलवर मान टाकून ढसाढसा रडायला लागला. आजूबाजूच्या टेबलवरील मुलं मुली आमच्याकडे त्रासिक नजरेत पाहत होती. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता मी विनयचा हात हातात घेऊन त्याला ओढत ट्रॅक वर घेऊन आलो कारण मला त्या प्रेक्षकांसाठी हा विषय मनोरंजनाचे साधन बनवायचा नव्हता.


        विन्याला मी ट्रॅकवर एका ठिकाणी बसवलं आणि मी त्याच्या बाजूला बसलो. विन्या आणखीन पण रडतंच होता. त्याच्या पाठीवर थाप मारत मी त्याला शांत करण्याचा काहीसा प्रयत्न केला. काही वेळाने तो शांत झाला आणि स्वतःच बोलायला लागला, "नाही रे जया...आणखीन नाही सहन होत हे ओझं, वीट आलाय मला.” त्याच्या मनावरील ताण हलका करण्यासाठी मी त्याला म्हणालो, “जरा शांत हो आणि काय झालं ते सांग.”


         विनेश आपली व्यथा मला सांगायला लागला," लातूर जिल्ह्यात एक लहानसं गाव आहे माझं. गावातील शाळेत सर्वात हुशार होतो म्हणून मला शहरात पाठवलं शिकायला. ऐपत नव्हती रे तेवढी आमची, पण माझ्या बापाला फारच उत्साह पोराला शिकवायचा! तिथे पण चांगलीच प्रगती होती शाळेत माझी त्यामुळे आमच्या घरच्यांचा उत्साह आणखीन शिगेला!! जसा जसा मी एक-एक वर्ग पास  होऊन पुढच्या वर्गात जात होतो तसं-तसं त्यांच्या माझ्याकडून अपेक्षा आणखीनच वाढत होत्या. एकुलता एक ना मी त्यांचा...! माझ्यावर प्रेम पण तेवढच करायचे आणि मी त्या प्रेमापोटी अभ्यास. ११ वी १२वीत चांगलं कॉलेज असताना खाजगी शिकवणी पण मला लावून दिली. भर दुष्काळाचा मोसम होता तो. मागच्या २ वर्षापासुन शेतात काही पिकलं नाही, घरात पैशाची चणचण आहे हे मला जाणवत होत पण वडिलांनी स्वतः याबद्दल एक शब्दही माझ्याकडे काढला नाही. मी लातुरात शिकायला, घरापासून दूर. पण घराकडे काय चालू आहे याबद्दल मला एक कण पण माहिती पडू नाही द्यायचे. १२वी झाली, इंजिनीरिंग ची २ वर्षे झाली; आणि मी इकडे आरामाची जिंदगी जगत असताना घराकडे काय चालू होत? दुष्काळात त्या शेतीत काही पिकत नव्हतं. लहान खेडेच रे ते आमचं, सरकार पण काय लक्ष देत आमच्याकडे..! बाप भेटेल ते काम करायचा, कधी मजुरी तर कधी दुकानावर सावकाराच्या हाताखाली बसायचा. आई मिळेल ते काम करायची, कधी धुणीभांडी वा कधी काही. शेतीत चांगलं पीक आलं असता तर ही वेळ नसती रे आली पण तो राक्षसी दुष्काळ छातीवरच बसला होता ना आमच्या सर्वांच्या. या सर्व गोष्टी मला कळू नये याची दोघेही काळजी घ्यायचे, पण जसजशा गोष्टी मला कळत होत्या तस-तस मी अधिक कमजोर होत गेलो. माझा स्वतःवरील विश्वास भीती आणि चिंतेत परावर्तित होत गेला. पण त्यांच्या अपेक्षा काही कमी होत नव्हत्या. त्या आणखीनच वाढत होत्या की हा शिकणार, आपल्याला गरिबीतून बाहेर काढणार. आता मागच्या सुट्ट्यात गेलो तर कळालं की माझ्यासाठी आतापर्यंत ४.५ लाखाचं कर्ज काढलेलं आहे. तुझ्यासाठी काय ते माहिती नाही पण आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्यांसाठी ही  फार मोठी रक्कम असते. माझ्यावरच्या त्या विश्वासाचं आणि अपेक्षेचं ओझं आता मला पेलवत नाही. मी खरोखरच त्या लायकीचा आहे का? इकडे मी निवांत जगतोय आणि तिकडे माझे माय-बाप त्या नांगराला जुंपलेल्या बैलासारखं दिवस-रात्र राबतात. विचार करून माझं डोकं फुटायची वेळ आली आहे, नको जया नकोच हे काही. मी मोकळा होतो या जबाबदारीतून. दे मला ती बाटली", असं म्हणून विन्या माझ्याकडून बाटली हिसकावून घ्यायचा प्रयत्न करू लागला. मी ती बाटली जोरात जमिनीवर आपटून फोडली.


            मला कळून चुकलं की हा आपल्या आवाक्याच्या बाहेर गेलाय. मी थेट त्याला Counselling Cell च्या पगारे सरांच्या केबिन मध्ये घेऊन गेलो आणि सरांना सर्व सांगितलं. विनेशशी एकटं बोलायचं म्हणून सरांनी मला बाहेर बसायला सांगितलं. मी त्याला आत सोडलं आणि केबिन बाहेर असलेल्या बाकावर येऊन बसलो. मनात कितीतरी विचार येत होते ; डोळ्यातून पाणी तरळत होते. ते पुसण्याइतकं पण माझं भान राहील नव्हतं. कशी बहिरूपी असतात ना काही लोक; जगभराच्या चिंतेचे ओझे मनावर घेऊन फिरत असतात पण चेहऱ्यावर त्याचा एक कण देखील जाणवू देत नाहीत. मला स्पष्ट आठवतं, फर्स्ट इयर ला असताना माझा M2 बॅक होता. जेव्हा मी सगळ्या आशा सोडून दिल्या होत्या; तेव्हा मला आत्मविश्वास देणारा, सावरणारा खांद्यावर पडलेला हात विनेशचाच होता. पण हाच विनेश या थराला कसा काय जाऊ शकतो. खरं म्हणजे मूर्ख होता विनेश जो असं काही करायला निघाला होता; आणि मला यायला काही क्षण जरी उशीर झाला असता तर? अन त्याचं काही बरं-वाईट झालं असतं तर.......?


     डायरीची पाने ओली झाली होती. त्यावर जमा झालेले अश्रू मी हातानेच बाजूला सारले. मी त्या दिवशी देखील रडत होतो आणि आज देखील डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहायचं थांबत नव्हत्या; कारण विनेश शिवाय engineering ची ४ वर्ष मी imagine पण करू शकत नव्हतो. आज देखील मला वाटत की मी कॅन्टीनला न जाता लेक्चरला गेलो असतो तर..... माझी 75% Attendance तर भरली असती पण माझ्या या आयुष्याच्या पुस्तकातील मैत्रीचा chapter अपूर्णच राहीला असता.



*********************  END OF THE SEASON  *****************************




THIS PART OF 75% ATTENDANCE IS DEDICATED TO ALL PARENTS WHO WORK HARD SO THAT THEIR CHILD CAN FULFILL HIS/HER DREAMS.




                                                 DO READ AND SHARE !!

Comments

  1. Such an inspiring writer you are! You really made everyone live there four years once again..

    ReplyDelete
  2. खूपच छान!! आपण जर गोष्ट "Real life" सोबत निगडीत लिहली तर ती वाचकांच्या हृदयापर्यंत पोहचते याचा उत्तम नमुना आहे हा!! Keep it buddy🙌

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

NEET वाटेने जा !!

" या प्रश्नाला उत्तर मी बनणार "

स्टोरीमध्ये TWIST