आणखीन एक Rejection




                                                   75% ATTENDANCE 
                                                 PLACEMENT SEASON 




       अलार्मच्या कर्कश आवाजाने डोळे उघडले. घड्याळात पाहीले तर ७. ३८ झाले होते. ७ चा अलार्म लावलेला खरा पण वेळेवर जाग येईल तो मी कसला. त्यात रात्री झोपायला पण उशीर झालेला. Data Structure जे revise करायचं होतं. काल रात्री २ topics revise करायचे राहीले होते. म्हटलं सकाळी लवकर उठून करता येतील ; पण आता वेळ कुठे होता? ८ वाजता तर TPO ला  interview साठी पोहचायचं होत. काल apti झाली, त्यात शॉर्टलिस्ट झालो. आज त्या कंपनीचा interview होता. वेळ पाहून मी लगबगीने उठलो. घाईत तोंडावर पाणी मारलं, हातानेच केस सेट केले. बेड खाली पडलेली पॅन्ट घातली. त्यात buttons लावून शर्ट कसाबसा खोचला. गाठ मारून आधीच सेट करून ठेवलेला टाय गळ्यात घातला. File हातात घेतली. बाहेर येऊन पाहीले तर shoes दिसत नव्हते. आजूबाजूला निरखून पहिलं तर २ रूम सोडून असलेल्या दिन्याच्या रूमच्या बाहेर उलथेपालथे पडलेले दिसले. हॉस्टेल मध्ये राहण्याचा हा तोटा आहे ; तुम्हाला स्वतःला  देखील कळत नाही की तुमच्या वस्तू कुठे आहेत आणि कोण घेऊन गेल्यात ते. वेळेवर शोधाशोध करत बसावी लागते. मी पटकन जाऊन ते घातले आणि TPO च्या वाटेला लागलो. नाश्ता करायला तर आता वेळ नव्हताच. म्हटलं Lipton वरूनच एखादा बिस्कीट पुडा घेऊन जाऊ. 


      मनात कितीतरी विचार एकाच वेळी येत होते. Placement सुरु होऊन आता २० दिवस झाले होते. Company  येत होत्या जात होत्या. रोज कोणीतरी place होत होत. आणि मी रोज उठून apti देत होतो. काहीच्या apti क्लिअर झालेल्या पण Technical interview मधून  बाहेर पडत होतो. एका वेळेस तर HR Round पर्यंत गेलो होतो ; पण नशीब कुठे चांगल माझं. HR मधून बाहेर पडलो. आधी वाईट वाटायचं रिजेक्ट झाल्यावर ; पण आता या रिजेकशन्सची सवयच झाली होती. आता काही पण होवो काहीच वाटत नव्हत. मन अगदी निर्लज्ज झाल होत. तरीपण पण मनात आशा होती की आज तरी place व्हायला हवं. वीट आला होता ते रटाळ subjects वाचून. जीवावर येत होत ते परत परत वाचायला. placement  सुरु होण्याआधी जेव्हा २ महिने चांगल्या सुट्या होत्या ; तेव्हा निवांत वेळ होता अभ्यास करायला. तेव्हा चांगला अभ्यास केला असता तर ऐव्हाना झालो देखील असतो place. पण मी तेव्हा Placement ला फारच lightly घेतलेलं आणि आता घाईमध्ये कोणताच subject चांगला होत नव्हता.    


                  विचार करता करता मी TPO च्या पायऱ्यापर्यंत येऊन देखील पोहचलो. माझ्यासारखेच बरेच चेहरे तिथे आत interview साठी येऊन बसले होते. मला co-ordinator ने आत waiting room मध्ये बसायला सांगितलं. खुर्चीवर बसलो ; माझा नंबर  यायला वेळ होता. हातात timepass साठी मोबईल घेतला पण social मीडिया मध्ये मन रमत नव्हतं. वेळ जात होता तशी बैचेनी पण वाढत होती. AC चे temperature २३ degree असून पण माझं शरीर गरम होतं. हृदयाची मंद धडधड स्पष्टपणे जाणवत होती. जस cabin मधून interview झालेल कोणी बाहेर येत होत तसं बाहेरची  मुलं त्यावर झपटून पडत होती आणि आत होत असणाऱ्या वस्त्रहरणाचा आढावा घेत होती. वस्रहरणाचं होतं ते एक प्रकारचं ; कारण मागची २ वर्ष average असलेल्या पॉईंटर मुळे काही लाज राखलेली आणि मनाला शाश्वती असायची की चला येतं आपल्याला काहीतरी पण आत त्या केबिन मध्ये मुलांना स्वतःबद्दल असलेले सर्व भ्रम दूर होत होते आणि पॉईंटर च्या वस्त्राखाली असलेली आतली आमची खरी सत्यता प्रकट होत होती की खरंच आम्हाला किती येतंय. माझा interview ज्या पॅनलला होणार होता " ते तर सर्वात घाण फाडतंय "  अशी बाहेर येणार्यांची overall प्रतिक्रिया होती. उजवा हात छातीवर डाव्या बाजूला ठेवून ' all is well ' म्हणत मी स्वतःच्या मनाची तयारी करून घेतली. 


           आत जाण्याआधी  एकदा file पाहून घ्यावी म्हणून मी file चाळायला घेतली. १० वीत ९४%, १२ वीत ८२% आणि CPI ७.३३ छान  प्रोग्रेस बार चांगलाच खाली घसरत आला होता. तो progress bar पण नव्हता खरा. खाली घसरत आली ती प्रोग्रेस कशी. पण याच वाईट वाटत न्हवतं काहीच. Resume पाहीला त्यात तर बऱ्याच गोष्टींची नावेच माहीत होती आणि काय असतय त्यात ते पण माहीत नव्हतं ; पण resume भरून दिसायला हवा होता म्हणुन लिहून ठेवलेली. Achivements च्या नावाखाली sucessfully complete केलेली workshops टाकलेली. Hobbies आणि Interests तर सर्वांच्याच जवळपास सारख्याच होत्या. Hobbies - Reading,Watching movies,Travelling तर Interest - Coding, Photography, Current Affairs etc. आणि Strengths...आहाहा!!! Hardworking, Team-player, Persistent, Inquistive ही शब्द मला स्वतःलाच पटत नव्हती की माझ्यासाठीची आहेत. Inquistive चा तर अर्थपण माहिती नव्हता. बाजूच्या रूममधील सचिनचा resume कॉपी करत असताना त्यात होता म्हणून माझ्यात पण टाकून दिला. हा resume म्हणजे फारच कॉमेडी होता आणि tragedy चा म्हणजेच Interview चा माझा नंबर जवळ येत होता. मागच्या Interview मध्ये TI2 ला बाहेर काढलेलं. HR  थोडक्यात हुकलेला या वेळेस असं नको व्हायला. आज ही कंपनी काढायचीच असं मनात ठरवलं कारण आता वैताग आला होता अभ्यास करण्याचा.


       'जयेश सरपोतदार ' coordinator  ने नाव announce केलं. धस्स झालं छातीत,आणि नकळत हात वर झाला. " पुढचा नंबर तुझा आहे, तयार राहा " असं म्हणुन तो परत गेला. एकदाचे डोळे बंद केले, मोठा श्वास घेतला आणि आत गेलो. दार ढकलले आणि आत येण्याची permission घेतली. जसं त्यांनी मान हलवली आत गेलो आणि त्यांच्या समोर असलेल्या खुर्चीवर मान खाली घालून बसलो, गरीब गायीसारखा. पॅनलला दोघे होती. एकाचा तर चेहराच एवढा भीतीदायक होता की आधीच फाटलेली त्यात पाय थरथरायला लागले. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरून वाटत होतं की हा कदाचित सौम्य असावा. 
      
      'Introduce yourself ' मागच्या तीन सारखंच या Interview ची सुरवात पण त्याच एका प्रश्नाने झाली.मी आपलं नेहमीप्रमाणे रटून आलेलं answer दिलं. नाव - गाव - घर - १० वी - १२ वी -इंजिनीरिंग  - interest - hobby सांगणार म्हटलंच की लगेच तो रागीटवाला 'हा ... okay ...stop' अस म्हणुन त्याने मला थांबवल. मी माझी file त्यांच्या हातात दिली आणि त्यानें ती file न उघडता बाजूला table वर ठेवून दिली. हीच ती मागच्या ३ वर्षांची मेहनत. Hobby आणि interest तर सांगू पण दिले नाही, तेच तर खर Interesting होत माझ्या पूर्ण introduction मध्ये. Technical question  त्यांनी C पासून विचारायला सुरु केले. साधी Basic questions होते आणि मी त्यांची उत्तरे पण चांगल्या प्रकारे देत होतो. पण हळूहळू जसा Interview पुढे जात होता तस difficulty level पण वाढत जात होत. माझ कुठेकुठे अडखळत होत पण बऱ्यापैकी answer बरोबर पण देत होतो. एका ठिकाणी तर मी बरोबर answer केलेल तरीपण त्यांचं म्हणणं होत की ते जे सांगतायत तेच answer बरोबर आहे आणि मी सांगतो ते चुकीच आहे पण वाद  घालायच मी टाळलं कारण package द्यायच का नाही ते त्यांच्याच हातात होत .'yes सर ,I agree with you' अस म्हणुन मी शेवटी ते टाळलं आणि interview पुढे सरकवला. ते सोडल तर Interview चांगलाच जात होता. पण चांगली असेल ती माझी किस्मत कशी ? मी जी गोष्ट होऊ नये म्हणुन प्रार्थना करत होतो तीच आता होत होती. त्यांनी shift मारला Data Structure कडे आणि विचारायला लागले Data Structure tree वर. हा तोच २ topic मधला १ topic होता जो करायचा सोडला होता आणि आधी १-२ वेळेसच वाचला असल्याने काही काही आठवत होत पण समोर बसलेल्या या २ माणसांना impress करण्यासाठी ते काही पुरेस नव्हतं. २-३ प्रश्न अडकल्यावर topic change करण्यासाठी मी त्यांना म्हंटल की " Sir, I am comfortable with stack and queue, will you please ask questions on these topics " पण नाही !!! ती मात्र tree वर अडून बसली ज्याची मला त्यांना पटतीलअशी उत्तरे देता येत नव्हती. आता आतल्या आत स्वतःला शिव्या देत होतो की सकाळी लवकर उठायला हवं होतं. जर ती chapter सकाळी चांगली  revise केली असती तर आता फाडफाड उत्तरे दिली असती. जसा confidence वाढला होता त्यापेक्षा जास्त speed ने तो आता कमी पण होत होता आणि काहीसा स्पष्ट असलेला आवाज आता मृदू बनत होता आणि एक point असा आला की प्रश्न विचारला होता त्याच काहीच आठवत नव्हत आणि काय उत्तर द्यावं ते पण कळत नव्हतं. शेवटी जेव्हा त्यांना पटलं की माझी बोलण्याची क्षमता आता संपली आहे आणि मला काही येत नाही हे मला देखील कळून चुकलंय ; त्यांनी मला बाहेर जाऊन वाट पाहायला सांगितल.


 मी TPO हॉल मध्ये जाऊन खुर्चीवर बसलो .file बाजुला ठेवली .डोके  वाकवुन त्यावर दोन्ही हात ठेवले .सकाळी उठून ते २ chapter का केले नाही याचा आता मला पश्चाताप होत होता.  आता पश्चाताप करून पण काय फायदा होता. " भले package ६ च्या ऐवजी ४ भेटू दे ; पण आज placement होऊ दे !", अशी प्रार्थना मी देवाला मनातल्या मनात करत होतो. काही वेळेनंतर coordinator लिस्ट घेऊन बाहेर आला आणि नावं announce करायला त्याने सुरुवात केली. ७-८ नावे झाली पण माझं नाव काही येत नव्हतं. प्रत्येक नावासोबत उत्कंठा पण वाढत जात होती. " जयेश सरपोतदार ", आणि शेवटी माझा नाव घेऊन लिस्ट संपली आणि coordinator बोलायचं थांबला. लिस्ट मध्ये नाव आलं म्हणून मी एक निःश्वास टाकला. आमच्या सगळ्यांकडे coordinator म्हणाला, "हे सर्व जण जाऊ शकता, बाकी मुलांचे पुढचे round होतील". " काय ? " मी जोरात उद्दगारलो. " काय म्हणजे ? तुम्ही बाहेर पडला आहेत या राऊंड मधून, तुम्ही आता जाऊ शकता ".पुढच्या राऊंड साठी सिलेक्ट झालेली मुलं तो सरळसरळ पण सांगू शकला असता. हा काही reality show आहे का असा thrill and drama तयार करायला.आता त्याला तरी काय बोलणार आपलंच नशीब पांडू आहे तर. 
      
   चला आणखीन एक rejection. जे पुढच्या राऊंड साठी qualify  झाले होते, त्यांच्या चेहऱ्यावर काहीसं हास्य पसरला होतं. अस नाही की पुढच्या राऊंड मध्ये त्यांची लागणार नव्हती पण एक round पार केल्याच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होतं. आणि आम्ही रिजेक्ट झालेले सर्व तोंड पाडून TPO च्या बाहेर पडायला लागलो. नशिबाने आज पण साथ नव्हती दिली तर. आता अपेक्षित काय होत या परिस्थितीत?  रिजेक्ट झालो म्हणुन रडत बसू का? पण नाही. रडणं तर सोडा साध वाईट देखील वाटत नव्हत. ताटामध्ये आवडीचे जेवण नसेल तरी गप खाऊन पचवावंच लागत ना. काही option असतो का मेस मध्ये. तसच आयुष्याचं पण आहे. प्रत्येक वेळेस चांगलंच भेटेल असं पण काही नसतं ना. बऱ्याच वेळेस rejections पण पचवून घ्यावीच लागतात. आता हे वयामुळे असावं व अनुभवाचे बोल ; या अशा छान गोष्टी समजायचा आणि समजूतदार गोष्टी बोलण्याचा सामंजस्यपणा अंगी आला होता. पण आता पुढे काय? परत तेच !! उद्या परत सकाळी टाय  घालून बसणार Apti द्यायला पुढच्या कंपनीची.              


     



                                                     Poster Credit - Rushikesh Kawade and Adish Deshpande
  
     
  

                                  

SUBSCRIBE , COMMENT AND SHARE …!!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

NEET वाटेने जा !!

" या प्रश्नाला उत्तर मी बनणार "

स्टोरीमध्ये TWIST